पंढरपूर यात्रा – आषाढी वारी 2024

विठ्ठल! विटेवर उभं असणारं विठ्ठलाचं सावळं, देखणं रूप. त्याचं दर्शन घ्यावं, आपलं मागणं मांडावं म्हणून लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरची वारी करतात. जवळपास 800 वर्ष ही वारीची परंपरा महाराष्ट्रात चालत आलीय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठलाचं नाव घेत, ‘ग्यानबा तुकाराम’चा गजर करत वारकरी पायी चालत पंढरपूरला निघतात. देहू-आळंदीहून तुकोबाराय, ज्ञानोबा माऊलींची पालखी पंढरपूरला जायला निघते. लाखो लोक एकत्र येतात. अवघा महाराष्ट्र ‘विठ्ठलमय’ होऊन जातो.

वारीत कुणीही कुणाला बोलवत नाही. तरीही फक्त विठूरायाचं दर्शन घ्यावं, त्याच्या पायांवर डोकं ठेवावं म्हणून वारकरी चालत राहतात. पंढरपूरला निघालेल्या या वारकऱ्यांची सेवा घडावी म्हणून यंदाच्या वारीत सकल मराठा परिवार आणि वर्शिप अर्थ फाउंडेशन सहभागी होणार आहेत. आपल्या दोन ऍम्ब्युलन्स वारीत वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा पुरवणार आहेत. वारकऱ्यांची सेवा करता करता आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ऊनापावसाची, आपल्या तब्येतीची पर्वा न करता पायी चालत जाण्याचं बळ येतं कुठून ते जाणून घेणार आहोत. वारीचे आजपर्यंतचे वेगवेगळे अनुभव, त्यांचं आयुष्य या सगळ्याबद्दल बोलणार आहोत. वारीत कितीतरी लोक उत्साहाने सहभागी होतात.कितीतरी वर्षं नेमाने वारी करणाऱ्या म्हाताऱ्या माणसांपासून तरूण, शिक्षित युवकांपर्यंत… प्रत्येकाचं आयुष्य वेगळं पण विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ सगळ्यांना एकत्र आणते. हे वारकरी विठ्ठलापाशी नेमकं काय मागणं मागतात, त्यांच्या इच्छा, समस्या, अनुभव आपल्यालाही कळावे म्हणून यंदा ही वारी. वारकऱ्यांचं मागणं काय आहे, त्यांच्या इच्छा काय आहेत, त्या पूर्ण होतायत का, घरदार सोडून एकवीस दिवस वारीला येताना त्यांच्या मनात काय असतं या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत.

वारकरी आणि त्यांचं नेहमीचं जगणं समजून घ्यायचं आहेच पण सोबतच आपल्याकडून होईल ती सेवा करावी हा आपला वारीत सहभागी व्हायचा उद्देश. वारकऱ्यांचं म्हणणं विठ्ठलापर्यंत तर पोहोचतंच. त्याला सगळंच माहितीय. पण आपल्या समाजातल्या, आपल्यासारख्या माणसांबद्दल आपल्याला खरंच किती माहितीय हे तपासून पाहायला हवं. त्यासाठी त्यांच्यासोबत बोलणं महत्त्वाचं आणि हाच संवाद व्हावा म्हणून आम्ही वारीत सहभागी होणार आहोत. वारकऱ्यांची सेवा करावी, त्यांचे प्रश्न समजून घ्यावे आणि आपल्याला शक्य आहे तेवढी मदत करावी अशी इच्छा आहे. म्हणूनच आमची टीम यंदा वारकऱ्यांच्या सोबतीने पंढरपूरला जाणार आहे. विठ्ठल तर पाठीशी आहेच… तुम्हा सगळ्यांची सोबतही असू द्या!

जय हरी विठ्ठल!

Exit mobile version